अहिल्यानगर : केदारेश्वर कारखान्याने २ लाख ७ हजार मेट्रिक टन गाळप पूर्ण केले असून, पुढील हंगामात ५ हजार मेट्रिक टन कार्यक्षमता वाढवण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. पुढील हंगामात सहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. केदारेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता प्रादेशिक सहसंचालक संतोष गोंदे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, राजाजी बुधवंत, माजी प्राचार्य वसंतराव सानप, कमलेश संचेती यांच्या हस्ते विधिवत पूजा करून झाली.
यावेळी व्हाईस चेअरमन माधव काटे, ज्येष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, त्रिंबक चेमटे आदी उपस्थित होते. ढाकणे म्हणाले की, माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी डोंगराळ भागात केदारेश्वर कारखाना उभारून या भागाचे अर्थकारण बदलले. त्यामुळे येथील बाजारपेठ फुलली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गरजे, चीफ इंजिनिअर प्रवीण काळोसे, केमिस्ट रामनाथ पालवे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, अभिमन्यू विखे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, तुकाराम वारे, प्रभारी सुरक्षा अधिकार राजेंद्र केसभट आदी उपस्थित होते.


















