अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा सर्वाधिक दर देत आहे. मागील हंगामात उद्भवलेल्या अडचणीवर मात करून सभासद, शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यंदा पुढे जायचे आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीत कारखान्याचे वेगळेपण जपले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जपणूक आम्ही करीत आहोत, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी यंदा ऊस गाळपाचे आठ लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कोल्हे म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादन वाढ करून शेतकरी सभासदांना त्याचा सर्वाधिक फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखान्याने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. सभासद शेतकऱ्यांचा सहकार्याने ते यशस्वी करण्यावर भर देत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. यावेळी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी या हंगामातील सर्व कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी स्वागत केले. आजी-माजी संचालक, खाते प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आभार मानले.