अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यातील कामगारांना १० टक्के वेतनवाढीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा

अहिल्यानगर : राज्यात यंदा जास्त पाऊस झाला. उसाचे टनेज घटले, कारखान्यांची संख्या वाढली. गाळप क्षमता वाढली. ऊस मिळवण्यासाठी स्पर्धा झाल्या. अशा काळातही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ११० दिवसांमध्ये ११.४० रिकव्हरी दिली असून ७ लाख ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. आगामी काळात कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढीसह एकरी उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय नियमांनुसार १० टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा त्यांनी केली.

कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. थोरात म्हणाले की, अर्थव्यवस्था करण्यामध्ये बळकट साखर कारखान्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये कर्जाचे पुनर्गठण करणे, एमएसपी साधारण चार हजार रुपये करणे, बिगरव्याजी कर्ज देणे, इथेनॉलला भाव देणे, कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देणे अशा प्रोत्साहनपर योजना केंद्र सरकारने राबवल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. व्यासपीठावर अँड. माधव कानवडे, उपाध्यक्ष पांडुरंग घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सभापती शंकर खेमनर, लक्ष्मण कुटे, सुधाकर जोशी, बाबासाहेब ओहोळ, संपत डोंगरे, इंद्रजित थोरात, हौशीराम सोनवणे, कारखान्याचे संचालक संतोष हासे, संपत गोडगे, विजय राहाणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते. जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग घुले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here