अहिल्यानगर : अगस्ती सहकारी साखर कारखाना सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने या अगस्ती कारखान्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी आ. डॉ. किरण लहामटे यांनी विधीमंडळ सभागृहात केली. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना आ. लहामटे यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात मांडले. आमदार लहमटे यांनी लिंगदेव – वाघापूर पुलाची मागणी केली. हा पूल झाल्यास त्या परिसरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार लहमटे म्हणाले की, शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली. अकोले मतदारसंघात सुमारे ३००० घरकुलांची गरज असताना फक्त २५० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत शबरी घरकुल योजना पूर्ण कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे बारी ते संगमनेर रस्ता हॅम पद्धतीने २०१८-१९ मध्ये मंजूर झाला. २०२० पासून काम सुरू झाले. मात्र रस्ता पूर्णत्वास येण्याच्या टप्प्यावर असताना अनेक ठिकाणी उखडून गेला आहे. सध्या सुरू असलेली दुरुस्ती अत्यंत जुजबी स्वरूपाची असून ठेकेदाराकडून होत असलेल्या बेफिकीरीकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. हा रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली.


















