अहिल्यानगर : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस ३१ मार्चपूर्वी गाळप करता येईल, इतकी विस्तारित गाळप क्षमता निर्माण केली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आगामी हंगामात कारखाना दहा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री गडाख म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रोत्साहन योजनेचा फायदा घेत कारखान्याने नवीन इथेनॉल प्रकल्प उभारला. २७ वर्ष जुन्या डिस्टिलरचीसुद्धा विस्तारवाढ केली. दोन्ही प्रकल्प मिळून रोज सव्वा लाख लिटर इथेनॉल निर्मिती करता येईल, इतकी प्रकल्प क्षमता आहे. कारखान्याने गाळप क्षमता व इथेनॉल प्रकल्पासाठी ऊस पेमेंट मधून ठेवी कपात केल्या नाहीत. स्वनिधी आणि कर्जातून हे प्रकल्प उभे केले. मात्र, त्यानंतर गेल्या तीन हंगामात ऊस गाळप निर्धारित क्षमतेच्या ५० ते ६० टक्क्यांवर आले. त्यामुळे खर्च वाढला. पण हप्ते वेळेवर फेडले. तेवढ्या प्रमाणात व्याजाचा बोजा सहन करावा लागला. शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस मुळा कारखान्यालाच गळीतासाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी स्वागत केले. शंकरराव दरंदले, रितेश टेमक, टी. आर. राऊत, योगेश घावटे यांनी विविध विषयांची माहिती दिली.