अहिल्यानगर : पर्यावरणाला हानी पोहोचल्याने नागवडे साखर कारखान्याला दंड;राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय

अहिल्यानगर : कारखान्यातील मळीच्या टाकीचा स्फोट होऊन घोड नदीपात्रात, तसेच परिसरात दूषित पाणी जाऊन पर्यावरणाला हानी पोहोचल्याने राष्ट्रीय हरित लवादाने येथील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याला १ कोटी ६ लाख ७ हजार ९० रुपयांचा दंड ठोठावला आहे, तसेच प्रतिबंधात्मक उपायांसाठी ७५ लाख आणि सुधारणात्मक कामांसाठी ५१ लाख रुपये खर्च करण्याचेही निर्देशही दिले आहेत. त्यामुळे कारखान्याला एकूण २ कोटी ३२ लाख कारखान्याला द्यावे लागणार आहेत.

याबाबत काष्टी येथील सचिन सुदाम पाचपुते यांनी हरित लवादाकडे तक्रार केली होती. पाचपुते यांच्यावतीने ॲड. तानाजी बी. गंभीरे आणि ॲड. विजय म्हस्के यांनी युक्तिवाद केला. लवादासमोर ॲड. तानाजी गंभीरे यांनी पुराव्यासह सिद्ध केले की, १० फेब्रुवारी २०२२ रोजी कारखान्याच्या मळीच्या टाकीचा स्फोट झाल्यामुळे अंदाजे १० ते १२ हजार मेट्रिक टन मळी सांडली होती. स्फोटामुळे मळी कारखान्याच्या परिसरातील शेती जमिनीत पसरली आणि जवळच्या नैसर्गिक नाल्यात (माळीचा ओढा), घोड नदीपात्रातही गेली.

या स्फोटामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची भिंत कोसळली आणि पर्यावरणासह शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. या मळीच्या आम्लयुक्त स्वरूपामुळे आणि तापमानामुळे परिसरातील ५ निलगिरीची झाडे जळाली होती. असे मुद्दे लवादाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सुनावणीच्या दरम्यान कारखान्याच्या वतीने ॲड. संग्रामसिंग आर. भोसले, ॲड. समृद्धी एस. जैन, ॲड. नृपाल ए. डिंगणकर, ॲड. पुष्कर ए. भोसले आणि ॲड. नमन शेरस्त्रा यांनी बाजू मांडली, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ॲड. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंकडील सुनावणीनंतर न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह व डॉ. सुजीत कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने निकाल दिला.

पर्यावरणाच्या नुकसानीप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने नागवडे साखर कारखान्यातील सांडपाणी गळतीमुळे आणि मळीच्या टाकीच्या स्फोटामुळे घोड नदी व परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे ताशेरे ओढत, न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह डॉ. सुजीत कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने कारखान्याला १ कोटी ६ लाख ७ हजार ९० रुपयांचा पर्यावरणीय दंड ठोठावला आहे, शिवाय प्रतिबंधात्मक उपायांसाठी ७५ लाख आणि सुधारणात्मक कामांसाठी ५१ लाख रुपये खर्च करण्याचेही निर्देशही दिले, असे एकूण २ कोटी ३२ लाख कारखान्याला द्यावे लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here