अहिल्यानगर : पूरग्रस्तांना चारच साखर कारखान्यांकडून मदत, दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता

अहिल्यानगर : साखर कारखाने हा जिल्ह्याचा आर्थिक कणा आहेत. जिल्ह्याचे अर्थकारण कारखान्यांवर अवलंबून आहे. जिल्ह्यात सहकारी १४, तर खासगी ८ साखर कारखाने आहेत. कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ८ लाख ३४ हजार शेतकऱ्यांच्या ५ लाख ७६ हजार हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली. शेती खरडून गेली. घरे पडली. मात्र, सरकारी मदतीचा एक रुपयादेखील खात्यात जमा झाला नाही. जिल्ह्यातील चार कारखाने वगळता इतर कारखान्यांनी पूरग्रस्तांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीचा सण कसा साजरा करायचा?, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

दैनिक ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध बातमीमध्ये म्हटले आहे की, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. दिवाळीला सुरुवात होत आहे. परंतु, अद्याप जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. संकट काळात साखर कारखाने मदतीला धावून येतील, अशी अशा शेतकऱ्यांना होती. परंतु, प्रवरा, संजीवनी, अमृत आणि वृद्धेश्वर या उद्योग समुहांनी पूरग्रस्तांसाठी मदत दिली. उर्वरित साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप मदत केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर शेतकरी संघटना गप्प का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here