अहिल्यानगर : राहुरीतील कारखाना जसा बंद पाडला तशाच पद्धतीने अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव सध्या सत्तेत असणाऱ्यांनी रचला आहे. हा डाव हाणून पाडा. हा कारखाना शेतकऱ्यांसाठी कामधेून आहे. तो टिकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. टाकळीभान येथे अशोक बंधाऱ्याचे जलपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुरकुटे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके होते. जलपुजनाचा कार्यक्रम हे फक्त निमित्त आहे. मात्र अशोक कारखान्याबद्दल चुकीची माहिती पोहोचविली जात आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ती माहिती मिळावी, या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले.
माजी आमदार मुरुकुटे म्हणाले की, हा कारखाना जपण्यासाठी आम्ही जुन्या पिढीतील लोकांनी संघर्ष केला आहे. आपली संस्था टिकली पाहिजे यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी अशोकलाच ऊस द्यावा. त्यावेळेस केलेल्या संघर्षामुळेच हा परिसर सुजलाम सुफलाम झाला. मात्र हल्ली तरूण पिढी म्हणते, की दुसरे कारखाने भाव जास्त देत आहेत. म्हणून बाहेर ऊस गेला. मात्र, शेजारील मुळा, ज्ञानेश्वर यांचे गाळप आपल्यापेक्षा जास्त असूनही त्यांचा भाव आपल्या बरोबरीने म्हणजेच २७०० रुपये आहे हे लक्षात घ्या. यावेळी माजी संचालक एकनाथ लेलकर, कारेगाव भाग संचालक शिवाजी शिंदे, अशोकचे नूतन संचालक नीरज मुरकुटे, बाजार समिती संचालक मयुर पटारे, दत्तात्रय नाईक, पुंजाहरी शिंदे, गणेश छल्लारे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, भाऊसाहेब पटारे, संजय पठारे, लक्ष्मण सटाले, भागवत रणनवरे, संजय रणनवरे, शिवाजी पठारे, दत्तात्रय पठारे, रावसाहेब वाघुले, मच्छिंद्र कोकणे, भास्कर कोकणे, दत्तात्रय बोडखे, सुनील बोडखे, सुनील त्रिभुवन, जालींदर वेताळ, अमोल पटारे, नानासाहेब लेलकर, अमोल कोकणे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय कोकणे, उत्तम पवार, शिवाजी नवले आदी उपस्थित होते.