अहिल्यानगर: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरिपातील ‘फुले वसंधुरा’ हे गोड ज्वारीचे वाण विकसित केले आहे. वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख, डॉ. एम. एस. शिंदे यांनी गोड ज्वारीच्या संशोधनामध्ये यश मिळविले आहे. दहा वर्षाच्या अथक मेहनतीनंतर २०२१ मध्ये गोड ज्वारीचे वाण विकसित केले गेले. आता त्याला देशभरामध्ये मान्यता देण्यात आली आहे. भरड धान्य संशोधन संस्थेच्या कोइम्बतूर, लुधियाना, धारवाड, अकोला आदी १२ केंद्रांवरही चाचणी पश्चात ते यशस्वी गणले गेले. हे वाण इथेनॉल निर्मिती क्षेत्रात क्रांती घडवेल, अशी अपेक्षा आहे.
‘फुले वसुंधरा’ या अवघ्या चार महिन्यांच्या पिकामध्ये साखर व रसाचे प्रमाण अधिक आहे. देशातील इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये क्रांतीची क्षमता असलेल्या गोड ज्वारीला उद्योग जगताच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. या ज्वारीचे उत्पादन ७० ते ८० टन येते. उसासारख्या १५ ते १६ महिने तोडणी कालावधीच्या पिकाच्या तुलनेत हे खूपच किफायतशीर ठरते. यात इथेनॉल निर्मितीला आवश्यक साखरेचे १७ डिग्री ब्रिक्स प्रमाण फुले वसुंधरामध्ये आहे. त्याशिवाय त्यात १४ ते १५ हजार लिटर ज्यूस निर्मितीची क्षमता आहे. फुले वसुंधरा या गोड ज्वारीची वाढ तब्बल १६ फुटांपेक्षा (५.२ मीटर) अधिक होते. उसापेक्षाही ही ज्वारी उंचीला अधिक आहे अशी माहिती ज्वारी संशोधन प्रकल्पाचे सहायक प्राध्यापक डॉ. उदयकुमार दळवी यांनी दिली.

















