अहिल्यानगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातर्फे बुधवारी ऊस पीक परिसंवाद व शेतकरी मेळावा झाला. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ऊस पीक शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. जमिनीची मशागत, योग्य वाणाची निवड, खत पाणी व्यवस्थापन करून एका एकरात २.५ किलो वजनाचे ४० हजार ऊस संख्या ठेवली तर एकरी १०० टन उत्पादन नक्की मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी माने यांनी एकरी १०० ते १५० टन ऊस उत्पादन घेण्यासाठी ऊस लागवडीपूर्वी जमिनीची मशागत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
लोकनेते मारुतरावजी घुले-पाटील साहेब यांच्या जयंतीदिनी १५ सप्टेंबर रोजी एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील यांनी दिली. कारखान्याचा हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून दररोज ९ हजार ५०० मेट्रिक टन ऊस गाळप व दीड लाख लिटर इथेनॉलची निर्मिती होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जैव शास्त्रज्ञ डॉ. भास्कर ताकटे यांनी कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या जैविक खतांची माहिती दिली. उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नारायण म्हस्के यांनी आभार मानले. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, डॉ. क्षितिज घुले पाटील, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, दादासाहेब गंडाळ, प्रा. नारायण म्हस्के, बबनराव भुसारी, भाऊसाहेब कांगुणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.