अहिल्यानगर : मुळा साखर कारखान्याने यंदाच्या हंगामाचे चोख नियोजन पूर्ण केले असून, शेतकऱ्यांना प्रतिटन ३,००० रुपये ऊस दर देण्यात येईल, अशी घोषणा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केली. कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगाम प्रारंभानिमित्त गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळाचे संस्थापक व माजी खासदार यशवंतराव गडाख होते. जिल्ह्यातील धरणांत पुरेसे पाणी असल्याने पुढील वर्षी १५ लाख टन उसाचे गाळप व्हावे यासाठी ऊसलागवड वाढण्यासाठी तीस कोटी रुपयांची योजना हाती घेतली आहे अशी घोषणाही त्यांनी केली.
माजी मंत्री गडाख म्हणाले की, पुढील वर्षाच्या प्रोत्साहन योजनेत शेतकऱ्यांना नवीन लागवडीकरिता एकरी आठ हजारांचे बेणे आणि सहा हजार रुपयांची खते देणार आहे. एक नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने गाळप सुरू करून नोंद असलेला सर्व ऊस वेळेत गाळप होईल. उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख, रामभाऊ जगताप, मुळा ग्राहक भंडारचे अध्यक्ष मदन डोळे, मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख, काकासाहेब गायके, दिलीप मोटे, दत्तात्रेय काळे, अजित मुरकुटे, खरेदी विक्रीचे प्रभाकर कोलते, मुळा बँकेचे अध्यक्ष माणिक होंडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे आदी उपस्थित होते. संचालक शरद बेल्हेकर यांनी स्वागत केले. सेवानिवृत्त ६८ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सचिव रितेश टेमकर यांनी आभार मानले.












