अहिल्यानगर : शॉर्टसर्किटने सहा एकरातील ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

अहिल्यानगर : सावळीविहीर (ता. कोपरगाव) परिसरात विद्युत रोहित्रांच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन दोन शेतकऱ्यांचा सहा एकरातील ऊस जळून खाक झाला. या प्रकारमध्ये सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात रोहित्रांच्या तारांचे घर्षण होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस जळाले. मात्र, महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चुकीच्या ठिकाणी असलेले रोहित्र हटवण्याची मागणी दुर्लक्षित झाल्याने हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सावळीविहीर परिसरातील सर्व्हे नंबर २३३ मध्ये हा आगीचा प्रकार घडला. मोहन आणि माधुरीताई गिरमे यांच्या सहा एकर शेतात २६५ जातीचा ऊस पूर्णपणे वाढलेला होता. हा ऊस कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याला नोंदणी केलेला होता. विद्युत रोहित्रांच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट झाले आणि आग लागून संपूर्ण शेत जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच मोहन गिरमे यांनी कर्मवीर काळे कारखाना आणि शिर्डी नगरपालिका आणि साईबाबा संस्थानच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. शिर्डी नगरपालिका आणि साईबाबा संस्थानच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत सहा एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला होता. गिरमे यांनी महसूल आणि कृषी विभागाला कळवले. तलाठ्यांनी पंचनामा करण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here