अहिल्यानगर : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीची श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी केली. आगामी दोन वर्षांत कारखाना व संलग्न शिक्षण संस्थांना गतवैभव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी महिनाभरात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे (एनसीडीसी) कारखान्याचा कर्ज प्रस्ताव पाठविला जाईल. या कर्जाच्या मंजुरीनंतर जिल्हा बँकेकडून कारखान्याचा ताबा घेऊन मशिनरीचे आधुनिकीकरण केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी चेअरमन अरुण तनपुरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा सत्कार केला.
अध्यक्ष तनपुरे म्हणाले की,थकीत कर्जापोटी कारखान्याची मालमत्ता जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. भविष्य निर्वाह निधीच्या थकबाकीमुळे कारखान्याचे सर्व बँकांतील खाती गोठविण्यात आली आहेत. कारखाना संलग्न शिक्षण संस्थांचा कारभार सुरू केला आहे. बँकेकडून परवानगी घेऊन कारखान्याचे लेखापरीक्षण सुरू केले. मागील संचालक मंडळाच्या काळातील तीन तर प्रशासक काळातील दोन वर्षांचे लेखापरीक्षण चालू आहे. प्रेरणा समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, ज्येष्ठ संचालक रावसाहेब तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ, बाजार समितीची उपसभापती रामदास बाचकर, कारखान्याचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखाना बचाव कृती समितीतर्फे समन्वयक अमृत धुमाळ यांनीही कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. अप्पासाहेब दूस, भरत पेरणे, प्रकाश देठे, दत्तात्रेय आढाव, पंढरीनाथ पवार यांनी मनोगत व्यक्त केले.