अहिल्यानगर : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन कार्यक्रम झाला. यावेळी कोल्हे यांनी उभ्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या वर्षीचा चालु साखर हंगाम अवघड जाण्याची शक्यता आहे, असे मत व्यक्त केले. अतिवृष्टीमुळे ऊस शेतातच आडवा झाला आहे. उत्पादनांत मोठी घट होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व राज्याच्या सर्व मंत्रिमंडळाने प्रथमच ३७ हजार कोटींची तरतुद केली आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बिपिन कोल्हे म्हणाले की, यंदाचा दिपावली सण शेतकऱ्यांसाठी कठीण आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह सर्वानाच फटका बसला आहे. केंद्राने उसाची एफआरपी वाढवली. पण साखर विक्रीचे दर तसेच आहेत. थेट उसाच्या रसापासुन उत्पादित इथेनॉलचे दर पडले आहेत. मात्र तांदुळ, मका, ग्रेन यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला जास्तीचा दर मिळत आहे. त्यामुळे खाजगी कारखान्यांना जादा फायदा होत आहे. यात बदल होण्याची गरज आहे. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, कामगारनेते मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, संचालक त्र्यंबक सरोदे, पराग संधान, संजय होन, पांडुरंग शिंदे, विश्वास महाले आदी उपस्थित होते.












