अहिल्यानगर : जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा एकूण २२ पैकी १९ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या कारखान्यांकडून आत्तापर्यंत ३१ लाख १४ हजार १४६ मे. टन गाळप व २२ लाख ६१ हजार ३१८ क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. यंदा कुकडी व केदारेश्वीर हे दोन सहकारी साखर कारखाने आणि साईकृपा देवदैठण हा खासगी कारखाना अद्याप सुरू झालेला नाही. उर्वरित कारखान्यांचा हंगाम सुरू झाला. यापैकी १० कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली. पद्श्री विखे पाटील व गंगामाई यांनी २९५० रु. तर ८ कारखान्यांनी ३ हजार रु. पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, ९ कारखान्यांकडून अद्यापही ऊसदर जाहीर करण्यात आलेला नाही.
जिल्ह्यातील पद्श्री विखे पाटील कारखान्याने २९५६ रुपये, गंगामाई कारखान्याने २९५० रुपये उचल जाहीर केली. तर अगस्ती, कर्मवीर काळे, अशोक, वृद्धेश्वणर, सहकारमहर्षी थोरात, लोकनेते घुले, प्रसाद शुगर, मुळा प्रत्येकी ३,००० रुपये पहिली उचल जाहीर केली. मात्र, कोल्हे, बारामती ॲग्रो, इंडोकॉन एबालिका, स्वामी समर्थ शुगर, सोपानराव ढसाळ, नागवडे, गणेश, गौरी शुगर, साईकृपा या कारखान्यांनी दर जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत कोल्हे कारखान्याने ९६ हजार ९७७ मे. टन ऊस गाळप व ६३ हजार २५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर पद्श्री विखे पाटील कारखान्याने २ लाख १३ हजार मे. टन गाळप करून १ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. बारामती अॅग्रोने ९६ हजार ३७२ मे. टन गाळप करून ८३ हजार १७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

















