अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथे ऊस प्रात्यक्षिक क्षेत्र भेट व शेतकरी मेळावा उत्साहात झाला. सिंजटा फाउंडेशन इंडिया व पर्यावरणाचे संरक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरवाला येथे खोडवा उसाच्या पाचटाचे शास्त्रीय व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पवन थोरात यांनी सिंजेंटा कंपनीच्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते.
प्रमुख मार्गदर्शक माजी कुलगुरू व कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे म्हणाले कि, ऊस उत्पादन वाढीसाठी विविध घटकांचा विचार करता जमिनीचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आणि रासायनिक खताला जिवाणू खतांची जोड आवश्यक आहे. जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढले असून सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे. जमिनी भुसभुशीत राहिल्या नाहीत. त्यामुळे उसाचे उत्पादन कमी होत चालले आहे.
ते म्हणाले, शेतकरी बंधूंनी जमिनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी व पाण्याचे व्यवस्थापन आणि समतोल साधण्यासाठी खतांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कीड व रोगांचा जैविक पद्धतीने नियंत्रण संदर्भात मार्गदर्शन केले. देवीदास खाटीक यांच्या शेतावर खोडव्यात पाचट शास्त्रीय पद्धतीने नियोजन याचे प्रदर्शन घेण्यात आले. समीर मिर्झा यांनी बदलत्या हवामानाचे मोठे आव्हान उभे राहिल्याचे सांगितले.