अहिल्यानगर : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेवगाव, गेवराई, पैठण परिसरातील शेतकऱ्यांची ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. सहा महिन्यानंतरही उसाचे पैसे न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. हे पैसे शेतकऱ्यांना व्याजासह एकरकमी अदा करावेत, अन्यथा ५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, सचिव बाळासाहेब फटांगडे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, मच्छिंद्र आरले, संतोष गायकवाड, अमोल देवढे, संदीप मोटकर, अशोक भोसले, प्रशांत भराट, नानासाहेब कातकडे, नारायण पायघन, संजय नाचन, उस्मान सय्यद उपस्थित होते.
याबाबत स्वाभिमानी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थकीत ऊस बिलांबाबत ऊस उत्पादकांच्या बैठकीत कारखाना प्रशासनाने १५ जुलैची मुदत दिली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत थकीत पेमेंट मुदतीत अदा केले जाईल, असा शब्द दिला. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना त्यांचे थकीत पैसे मिळालेले नाही. कारखाना प्रशासनाकडून जर तातडीने याची कार्यवाही झाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस उत्पादकांसह पाच ऑगस्टपासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करतील, याची नोंद संबंधीतांनी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.