अहिल्यानगर : येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील दहा आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन रद्द केला आहे. आरोपींमध्ये तलाठी किरण फातले, क्रांती शुगर या कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले यांचा समावेश आहे. संशयितांनी फिर्यादींवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे पुरावे फिर्यादीने न्यायालयासमोर ठेवले. सत्र न्यायालयाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आरोपींना मंजूर केलेल्या अटकपूर्व जामीनाचे संरक्षण काढून घेतले. आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
वर्षभरापूर्वी पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपनीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. नंतर सत्र न्यायालयाने आरोपींचा रिव्हीजन अर्ज फेटाळला. आरोपींनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सशर्त मंजूर करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने घातलेल्या अटी शर्तीचा भंग केल्याचा प्रकार लक्षात येताच, फिर्यादी असलेल्या पारनेर कारखाना बचाव समितीने आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यात सुमारे ४८ बनावट सातबारा उतारे तयार करणारा विसापूर येथे कार्यरत असलेला तलाठी किरण फातले याचाही अटकपूर्व जामीन न्यायालयाने रद्द केला आहे.
















