अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या धोकादायक पध्दतीने ऊस वाहतूक सुरु आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत अभिजीत पोटे यांनी ऊस वाहतुकीतील भीषण वास्तव मांडले. ओव्हरलोड ट्रॅक्टर-ट्रॉली व ट्रकमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा होत असून, ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर, टेललॅम्प, इंडिकेटर नसणे, वाहने रस्त्याच्या मधोमध चालवणे आदी प्रकार सुरु असल्याचे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर धोकादायक ऊस वाहतूक प्रकरणी साखर कारखान्यांवरसुद्धा कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजय गोंदे, श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, अनंता जोशी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शिवसेनेचे अभिजीत पोटे, संजय वाघ आदींसह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करा असे आदेश पोलिस व आरटीओ विभागाला दिले. ऊस वाहतुकीचा करार करताना वाहनाचा विमा, फिटनेस, चालक परवाना व वाहनातील फेरबदल तपासणे बंधनकारक असल्याची सूचना त्यांनी साखर कारखानदारांना केली. धोकादायक ऊस वाहतुकीची प्रथम जबाबदारी साखर कारखानदारांची आहे. ओव्हरलोड ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्यांनाही जबाबदार धरले जाईल. त्यामुळे लवकरात लवकर आवश्यक त्या सुधारणा करा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी आशिया यांनी दिला आहे.
















