अहिल्यानगर: शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील शेतकरी मुकुंद लक्ष्मण टाक यांच्या शेतात दहिगावने येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने ट्रॅक्टरचलित एक ओळ ऊस बेणे लागवड यंत्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ गादे, राजेंद्र जगदाळे, किशोर टाक, राजेंद्र गादे, साईनाथ गुंजाळ, मिठू शेटे, रामभाऊ उंदरे, दत्तात्रय वंजारी आदी उपस्थित होते. या यंत्राच्या साह्याने एक एकर ऊस लागवडीसाठी २.५ ते ३ तास लागतात. यंत्राच्या साह्याने उसाचे दोन डोळे बेणे कापणे, सरी पाडणे व सरीत ऊस बेणे लागवड करणे, तसेच खत पेरणी आणि तणनाशक फवारणी, अशी पाच कामे एकाच वेळी केली जातात. त्यामुळे ऊस लागवडीसाठी या यंत्राचा वापर शेतकऱ्यांना लागवड खर्चात बचत आणि मजूर समस्यावर प्रभावी उपाय ठरणार आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ राहुल एस. पाटील यांनी सांगितले की, ऊस शेतीतील दिवसेंदिवस वाढत्या लागवड खर्चाचे प्रमुख कारण म्हणजे मजूर समस्या. ऊस लागवड करत असताना ऊस बेणे तोडणे, त्याचे दोन डोळे बेणे तयार करणे, शेत तयार करून सरी पाडणे, नंतर या सरीत मजुरांच्या साह्याने ऊस बेणे सरीत दाबून घेणे आणि यासाठी सरीत पाणी चालू असणे गरजेचे असते. या समस्यांवर मात करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित एक ओळ ऊस बेणे लागवड यंत्र उपयोगी ठरेल. यावेळी ‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. कौशिक यांनीही मार्गदर्शन केले.

















