अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव, चाळीसगाव, जळगाव परिसरातून ऊस तोडणीच्या कामासाठी राज्यभरातील साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिवाळीची धामधूम अद्याप सुरूच असताना, एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू होत असल्याने ऊस तोडणी कामगार आपल्या संसारासकट या कामासाठी रवाना होऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उत्पादनाला सुरुवात केली आहे. तर येत्या आठवड्यात अनेक साखर कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळे तोडणी मजुरांची लगबग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून या महामार्गावर सतत ऊसतोड कामगारांचे ट्रॅक्टर दिसत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर कारखान्यांच्या गाळप हंगामासोबतच ऊसतोड कामगारांच्या दुःखाची साखळी सुरू झाली आहे. ट्रॅक्टरमधून साहित्य नेले जात आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलींमध्ये धान्याची पोती, कपडे, भांडी, सरपण, चूल आणि लहान मुले बसलेले दिसत आहेत. ऊसतोडीचा हंगाम म्हणजे त्यांच्यासाठी ‘कामाचा उत्सव’ पण त्यात सुटी नाही, सण नाही आणि विश्रांतीही नाही. कष्टाच्या मजुरीवर संसाराचा गाडा ओढणाऱ्या या कामगारांना सण, उत्सव, सुट्या काहीच मिळत नाहीत. ऊस तोडणी कामगारांचा सुरू झालेला प्रवास म्हणजे त्यांच्या जगण्याची चक्रं पुन्हा सुरू झाल्याचे द्योतक आहे.












