अहिल्यानगर : अशोक साखर कारखान्याने त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये २५ कोटी रुपये विविध करांच्या माध्यमातून सरकारकडे येणे असल्याचे दाखवले आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ पाच कोटी रुपये सरकारकडून येणे आहे, असे लेखापरीक्षण अहवाल सांगतो. त्यामुळे २० कोटी रुपयांचा फरक कसा आला, असा सवाल ‘अशोक’चे सभासद व शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त प्रतापराव भोसले यांनी उपस्थित केला आहे.
श्रीरामपूर येथे अशोक कारखान्याच्या २९ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारणसभेसंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत भोसले बोलत होते. अशोक कारखान्याच्या संस्थापकांपैकी एक असलेले सखाहरी भोसले हे प्रतापराव यांचे वडील होते. अशोक कारखाना ही वडिलांशी संबंधित संस्था आहे. तसेच या कारखान्याला आपल्या कुटुंबातील लोकांचा अडीच ते तीन हजार टन ऊस दरवर्षी गाळपाला येतो. मात्र, प्रत्येक वेळी टनामागे ३०० रुपये कमी भाव पदरात पडतो, असे भोसले यांनी सांगितले.
भोसले म्हणाले, येत्या सोमवारी ‘अशोक’च्या सभेत शेकडो शेतकऱ्यांसमवेत उपस्थित राहून त्यांचे प्रश्न मांडणार आहे. २०२७ मध्ये कारखान्यात परिवर्तन घडविणार आहे. साखरेला चांगला भाव मिळत असल्याने अशोक कारखान्याने ३५०० रुपये प्रतिटन भाव येणाऱ्या हंगामात द्यावा. त्याचबरोबर मागील दोन गाळप हंगामातील ५०० रुपये टनाप्रमाणे पैसे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अदा करावे, अशी मागणीही भोसले यांनी केली.