अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. त्यातून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही मातब्बर नेत्यांनी राजकीय नुकसानीची किंमत मोजली. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे-पाटील यांचा पराभव महायुतीच्या, तर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव महाविकास आघाडीच्या दृष्टीने धक्कादायक होता. त्यापाठोपाठ दोन्ही नेत्यांच्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका आल्या. या निवडणुकात संघर्ष अधिक वाढेल, अशी शक्यता होती. प्रामुख्याने संगमनेरमध्ये राजकारण गतिमान होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात दोन्ही मातब्बर नेत्यांनी एकमेकांच्या साखर कारखान्यात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आता आपापल्या साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे.
कारखान्याचे दहा ते पंधरा हजार सभासदांशी अध्यक्ष या नात्याने नित्याचा संपर्क येतो. एक सहकारी साखर कारखाना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांवर परिणाम करतो असे सांगितले जाते. हे लक्षात घेऊनच दोन्ही नेत्यांनी समंजस राजकारण केले. त्यातून आता बाळासाहेब थोरात हे तब्बल पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे अध्यक्ष झाले, तर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपत असलेले डॉ. विखे पाटील हे यापुढे साखर कारखान्याचे अध्यक्ष हे बिरूद लावून राजकारणात कार्यरत राहणार आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, तरीही थोरात यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गटात सभासद आणि शेतकऱ्यांचे मोठे मेळावे घेतले होते. त्यांच्या समोर भूमिका मांडली होती.