अहिल्यानगर : ‘शून्य टक्के कारखाना बंद’ या संकल्पनेचा सध्या विचार करण्याची गरज आहे. कारण कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापन त्यावर अवलंबून असते. ट्रकमालक, चालक, ऊसतोड यंत्रणेवर त्याचा थेट परिणाम होतो. ‘कारखाना बंद’मुळे प्रोसेसमध्ये मालाची प्रत बिघडते. इंटरमीडिएट प्रॉडक्टची प्रतवारी बिघडते. परिणामी साखरेचा दर्जा खालावतो. उत्पादन कमी होते, तोटा वाढतो. मोलॅसिसचे प्रमाण वाढते. तोडलेल्या उसाची प्रत बिघडते. मशिनरी रिपेअरचा खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी ‘शून्य टक्के कारखाना बंद’ संकल्पनेचा विचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वालू आहेर यांनी दिला. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर नुकतेच पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील होते.
शिबिरात आहेर यांनी साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन, मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर मार्गदर्शन केले. हायप्रेशर बॉयलर ऑपरेशन करताना उच्च दाब बॉयलर वीज निर्मितीसाठी असतात आणि म्हणूनच कमी प्रमाणात ६० टक्केपेक्षा स्टीम टेम्परेचर खाली जाऊ नये म्हणून स्टीम टेम्परेचर कंट्रोल ऑपरेटिव्ह असणे आवश्यक आहे. सर्व इंधनांसाठी हवा ते इंधन गुणोत्तर अभ्यासणे आवश्यक आहे. राख सतत काढून टाकल्यास क्लिंकर तयार होत नाही आणि परिणामी अनबर्नचा होणारी तोटा कमी होईल. पाण्याचा कमीत कमी वापर करावा असा सल्ला आहेर यांनी दिला. यावेळी कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष व माजी आ. पांडुरंग अभंग, संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रवींद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस. डी. चौधरी, एम. एस. मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील, बाळासाहेब डोहाळे, संभाजी माळवदे, विलास लोखंडे आदी उपस्थित होते.












