अहिल्यानगर – चालकाकडून साखरेसह ट्रकची चोरी, पोलिसांकडून आरोपीस अटक : साडेअठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : उल्हासनगर येथे २१.५०० टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची चोरी करत तो थेट गुजरातला नेला. श्रीरामपूर शहर पोलिसांनी सदरचा ट्रक व्यारा (जि. वापी, गुजरात) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चालकासह ताब्यात घेतला. ट्रक व साखर, असा एकूण साडेअठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

श्रीरामपूर येथील न्यू अमर ट्रान्स्पोर्टचे मालक इम्रान पोपटिया यांना श्रीरामपूर येथील साखरेचे व्यापारी श्याम ठक्कर यांनी २४ टन साखर उल्हासनगर येथील माँ ट्रेडर्सकडे पोहोच करण्याची ऑर्डर दिली होती. पोपटिया यांनी त्यासाठी ओळखीचे तुकाराम फुंदे यांचा ट्रक (एमएच ४६, एफ-५५७३) ऑर्डर पाठविण्यासाठी मागवला होता. ट्रकचालक सुदामा घनश्याम किरार (रा. परवार, ता. फतेगढ, जि. गुणा, मध्यप्रदेश) यास ट्रकमध्ये २४ टन साखर भरून दिली. सदरची साखर उल्हासनगर येथील माँ ट्रेडर्सकडे खाली करण्यास सांगितले. साखरेचा ट्रक १३ एप्रिलला माँ ट्रेडर्स येथे पोहचणे अपेक्षित असताना तो तेथे पोहचला नाही. त्यामुळे चालकाला फोन केला असता त्याने फोन बंद केल्याचे लक्षात आले. त्यानंतर ट्रकचे जीपीएस लोकेशन तपासले असता, ते बंद केल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी चालकाविरुध्द विश्वासाने सोपवलेला ट्रक व त्यामध्ये भरलेली २४ टन साखर, असा २९ लाख ४६ हजार २६० रुपये किमतीच्या मुद्देमालाचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपासासाठी पथकाची नियुक्ती केली. पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता ट्रक व्यारा (गुजरात) येथे असल्याचे समोर आले. पथकाने व्यारा गाठत चालकासह ट्रक ताब्यात घेतला. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचा ट्रक, ८ लाख ५० हजार रुपये किमतीची साखर, असा एकूण २८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here