अहिल्यानगर : ऊस तोडणी कामगाराच्या दोन मुलांचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश !

अहिल्यानगर : करोडी (ता. पाथर्डी) येथील ऊस तोडणी कामगार बनाजी खेडकर यांच्या तीन मुलांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शासकीय सेवेत नियुक्ती मिळविली आहे. बनाजी खेडकर यांनी वर्षानुवर्षे ऊसतोडणी कामगार म्हणून काम केले. आज ते शेतीकडे वळले आहेत. मात्र, त्यांचे कष्ट पाहून शिक्षणाचे साधन दुर्मिळ असताना जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी यशोशिखर गाठले आहे. बारा वर्षांपूर्वी त्यांचा थोरला मुलगा तुषार तलाठी बनला. आता उर्वरीत दोन मुलांनी राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

खेडकर बंधूंनी मिळवलेले यश इतर तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. बनाजी खेडकर यांची जीवनभराची मेहनत आणि त्याग मुलांच्या यशामागे प्रेरणास्तंभ ठरली. त्यांचा मोठा मुलगा तुषार हा १२ वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात तलाठी पदी रुजू झाला. त्यांचे धाकटे दोन मुलगे प्रशांत (वय ३३) आणि प्रवीण (वय २९) यांनी २०२३ मध्ये राज्यसेवा परीक्षा दिली होती. सप्टेंबर २०२४ मध्ये निकाल लागल्यानंतर, मे २०२५ मध्ये दोघांना शासकीय सेवेत रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाले. प्रशांत यांची निवड उद्योग अधिकारी पदासाठी झाली असून, प्रवीण यांची निवड महसूल सहायक म्हणून झाली. प्रशांत यांनी बी.ई. (मेकॅनिकल) तर प्रवीण यांनी एम.ए. इंग्रजी पूर्ण केले आहे. तिन्ही भावंडांनी वडिलांच्या कष्टाला फळ दिले आहे. यात अंगणवाडी सेविका असलेल्या आईनेही केलेल्या मदतीचा वाटा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here