अहिल्यानगर : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणातील तीनही पॅनलच्या मागणीनुसार मतदारांच्या सोयीसाठी राहुरी फॅक्टरी येथे एकाच ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार आहे. तेथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या खोल्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ओळखपत्र असल्याशिवाय मतदान करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नामदेव पाटील उपस्थित होते.
किरण सावंत-पाटील म्हणाले की, कारखान्याच्या मतदार यादीत उत्पादक २१,१०० आणि ‘ब’ वर्ग १९० मतदार आहेत. उत्पादक मतदारसंघात ६ गटांमधून १५, अनुसूचित जाती-जमाती १, भटक्या जाती, विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग १, महिला २, ‘ब’ वर्ग सहकारी संस्था १ असे एकूण २१ जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी एकूण ३६ खोल्या केल्या आहेत. त्यात एक खोली ‘ब’ वर्ग साठी, तर ३५ खोल्या उत्पादक मतदारांसाठी आहेत. प्रत्येक खोलीत तिन्ही पॅनलचे प्रत्येकी एक मतदान प्रतिनिधी, ७ मतदान अधिकारी-कर्मचारी, १ कर्मचारी असणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी २७५ कर्मचारी व २५ असे एकूण ३००, तसेच मतमोजणीसाठी १५५ कर्मचारी व २० अधिकारी असे एकूण १७५ जणांची नियुक्ती केली आहे. एक जून रोजी मतमोजणी होईल. ही प्रक्रिया राहुरी महाविद्यालयात होणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणी होऊन, त्यानंतर तत्काळ निकाल जाहीर केला जाईल.