अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांवर व्यक्तिगत लक्ष आहे. आता एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून एकरी ऊस उत्पादनात हमखास वाढ होईल यासाठी प्रयत्न करू. संजीवनी उद्योग समुहाच्या कार्यक्षेत्रात याचा वापर केला जाईल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केले. धामोरी येथे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी यांच्या शेतावर कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
बिपीन कोल्हे म्हणाले की, शेतकऱ्यांनी या प्रभावी तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रति एकरी ८० मेट्रिक टन उसाचे उत्पादन घ्यायचेच आहे. असा चंग बांधावा. १५ मे नंतर हुमणी अळीचे भुंगेरे बाहेर पडतात, ते गोळा करण्यासाठी सर्वांनी लाइट ट्रॅप शेतात लावावा. यामुळे हुमणी किडीचे नियंत्रण करण्यासाठी मदत होईल. एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन प्रति एकरी उसाचे उत्पादन वाढणार आहे. ऊस पिकात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंतरपिके घेतली आहेत. त्याबाबतचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळावे. शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवड केल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होऊन खर्चात ३० टक्के बचत होते. अशोक भाकरे यांनी प्रास्ताविक केले. कैलास माळी यांनी आभार मानले.