अहमदाबाद विमान दुर्घटना : २४२ प्रवाशांसह लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले

अहमदाबाद: २४२ प्रवाशांसह लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी (११ जून २०२५) दुपारी १:३८ वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच निवासी भागात (मेघनी नगर) कोसळले. या घटनेत अनेक लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाचे हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर ट्विन जेट होते, ज्यामध्ये पायलट इन कमांड सुमित सभरवाल आणि सह-पायलट क्लाइव्ह कुंदर यांच्यासह एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते.

पोलिस नियंत्रण कक्षानुसार, एअर इंडियाचे विमान एआय १७१ लंडनला जात होते. डीजीसीएच्या एका सूत्राने सांगितले की, १२ जून २०२५ रोजी, मेसर्स एअर इंडियाचे बी७८७ विमान व्हीटी-एएनबी अहमदाबादहून उड्डाण क्रमांक एआय-१७१ चालवत असताना अहमदाबादहून उड्डाणानंतर लगेचच कोसळले. कॅप्टन सुमित सभरवाल हे ८,२०० तासांचा अनुभव असलेले एलटीसी आहेत. सह-वैमानिकाला ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.

एटीसीनुसार, विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. एटीसीला ‘मेडे’ कॉल देण्यात आला, परंतु त्यानंतर, एटीसीने केलेल्या कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. धावपट्टी २३ वरून निघाल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर निघताना दिसत होता. एअर इंडियाने त्यांच्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अहमदाबाद-लंडन गॅटविक फ्लाइट क्रमांक एआय१७१ चा १२ जून २०२५ रोजी अपघातात झाला. सध्या, आम्ही तपशील तपासत आहोत आणि लवकरच http://airindia.com आणि आमच्या एक्स हँडलवर अधिक माहिती शेअर करू.

अहमदाबाद विमानतळावरील कामकाज स्थगित…

लंडनला जाणारी एअर इंडियाची विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाण कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, विमानतळ सध्या कार्यरत नाही. पुढील आदेश येईपर्यंत सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

पोलिसांनी रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर केला तयार…

अहमदाबाद पोलिसांनी सांगितले की, सर्व एजन्सी २-३ मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. आम्ही सर्व पत्रकारांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, रस्ते मोकळे करावे जेणेकरून आम्ही ग्रीन कॉरिडॉर तयार करू शकू आणि रुग्णवाहिकांसाठी सोपा मार्ग उपलब्ध करून देऊ शकू.

मुख्यमंत्र्यांनी बचाव आणि मदत कार्य करण्याचे दिले निर्देश…

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या घटनेने मला खूप दुःख झाले आहे. मी अधिकाऱ्यांना अपघातात बचाव आणि मदत कार्य करण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्याचे आणि प्राधान्याने रुग्णालयात उपचारांसाठी सर्व व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ पथके आणि केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी बोलून अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताच्या घटनेचा आढावा घेतला. मंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले की ते बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी अहमदाबादला जात आहेत. पंतप्रधानांनी मंत्र्यांना तातडीने सर्व आवश्यक मदत देण्याचे आणि परिस्थितीबद्दल नियमित अपडेट देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व संबंधित एजन्सी हाय अलर्टवर आहेत आणि समन्वित प्रयत्न सुरू आहेत.

केवळ ११ वर्ष जुनं विमान…

बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर ७८७ विमान केवळ ११ वर्ष जुनं होतं. या विमानाचं आयुष्य साधारणत: ३० ते ५० वर्षे असते, पण बहुतांश व्यावसायिक विमाने इतकी वर्षे सेवेत ठेवली जात नाहीत. सुरक्षेच्या कारणामुळे ही विमाने आधीच निवृत्त केली जातात. बोईंग ७८७ ड्रीमलायनर मध्यम आकाराचं विमान आहे. ते दीर्घकाळ उड्डाण करु शकते. त्याची प्रवासी क्षमता २१० ते २५० इतकी आहे. हे विमान ८५०० नॉटिकल मैल म्हणजेच ९८०० मैल अंतर कापू शकते. अहमदाबाद ते लंडन अंतर ७००० किलोमीटर इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here