पुणे : ऊस शेतीत एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर वाढविण्यासाठी राज्यातील १ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करण्यात येणार आहे. यातील १० हजार शेतकऱ्यांना व्हीएसआय व राज्य सरकार ९० हजार रुपये, तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रत्येकी प्रतिहेक्टरी ९ हजार २५० रुपये अनुदान देणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेला दोन वर्षांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात वापरू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटील, माणिकराव कोकाटे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर म्हणाले कि, ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्यासाठी राज्य सहकारी बँक साखर कारखान्यांना सहा टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे. प्रायोगिक तत्त्वासाठी कारखान्यांनी मागितलेली कर्जाची सर्व रक्कम देण्याची तयारी बँकेने ठेवली आहे. जिल्हा बँकांच्या अध्यक्षांशी तसेच सहकार आयुक्त व राज्य सहकारी बँक यांच्या समन्वयातून ऑनलाइन बैठकीचे आयोजनही केले जाईल.
ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी ‘व्हीएसआय’सोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार हा प्रयोग राबविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी व्हीएसआय 9,250 साखर कारखाना 6,750 देतील व स्वतः शेतकऱ्याला 9000 रुपये टाकावे लागतील. ‘व्हीएसआय’ राज्यातील 10 हजार शेतकऱ्यांना हे अनुदान देईल, तर राज्य सरकार उर्वरित 20 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार 250 रुपये देईल. यासाठी शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन आणि बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. ही यंत्रणा शेतकऱ्यांकडे लावल्यानंतर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सहायक कृषी अधिकारी यांना निर्देश देण्यात येतील.












