पाटणा : बिहारमधील सर्व बंद साखर कारखाने पुन्हा सुरू केले जातील आणि नवीन कारखान्याच्या स्थापनेसाठी एक नवीन धोरण तयार केले जात आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री नितीशन कुमार यांनी केली. बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औद्योगिक पुनरुज्जीवनाच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. दीर्घकाळ बंद असलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने हे पाऊल राज्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरू शकते.यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी, गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत बिहारमध्ये औद्योगिक विस्ताराला गती मिळाली आहे आणि नवीन सरकार ते पुढील स्तरावर नेण्यासाठी वचनबद्ध आहे. राज्यात आता औद्योगिक कॉरिडॉर, दर्जेदार वीजपुरवठा, सुधारित पाणी व्यवस्थापन आणि प्रशिक्षित मानव संसाधने यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. म्हणूनच, साखर उद्योगासारख्या प्रमुख क्षेत्रांना पुनरुज्जीवित करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. त्याचा थेट फायदा लाखो शेतकरी आणि स्थानिक तरुणांना होईल. पुढील पाच वर्षांत तरुणांना नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार वेगाने काम करत आहे. साखर कारखाने पुन्हा सुरू केल्याने केवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही तर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नोकऱ्याही निर्माण होतील.

















