वॉशिंग्टन : वाढत्या तापमानामुळे अमेरिकेत नागरिक साखरयुक्त सोडा आणि आईस्क्रीमसारख्या उत्पादनांकडे मोठ्या संख्येने वळत आहेत, असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. नेचर क्लायमेट चेंजमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार संशोधकांनी २००४ ते २०१९ पर्यंत अमेरिकेतील घरगुती अन्न खरेदी डेटा वापरून मासिक सरासरी तापमानाचा दररोज साखरेच्या वापरावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना असे आढळले की १२ ते ३० अंश सेल्सिअस किंवा सुमारे ५४ ते ८६ अंश फॅरेनहाइट तापमानात साखरयुक्त पदार्थांचा वापर झपाट्याने वाढल्याचे दिसून आले. जेव्हा तापमान २० अंश सेल्सिअस किंवा ६८ अंश फॅरेनहाइटपेक्षा जास्त होते तेव्हा साखरेच्या वापरात लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
या अभ्यासानुसार, सोडा आणि ज्यूस यासारख्या गोड पेयात साखरेचा वापर सर्वात मोठा वाटा होता. आइस्क्रीममध्ये साखरेच्या वापरात हळूहळू वाढ झाली आणि बेकरी उत्पादने, तेल आणि कच्च्या साखरेच्या प्रमाणात थोडीशी घट झाली. ही घट अधिक थंड, हायड्रेटिंग पदार्थांकडे संभाव्य कल दर्शवते असे संशोधकांनी सांगितले. उष्ण हवामानात द्रव आणि रेफ्रिजरेटेड उत्पादनांच्या शारीरिक आणि मानसिक मागणीमुळे पेये आणि गोठवलेल्या पदार्थांमध्ये साखरेच्या वापरात वाढ होण्याची शक्यता आहे.
या साखरयुक्त पदार्थांकडे कोण जास्त आकर्षित होते, यामध्येही फरक आढळून आला. अभ्यासात असे आढळले की कमी उत्पन्न गटातील आणि कमी शैक्षणिक पातळी असलेल्या लोकांमध्ये उच्च तापमानात साखरेचा वापर वाढण्याची शक्यता जास्त असते. तर याच काळात उच्च उत्पन्न गटातील आणि उच्च शैक्षणिक पातळी असलेल्या लोकांमध्ये साखर वापराबाबतीत कमी प्रतिसाद मिळतो.
साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे गंभीर आरोग्य परिणाम होऊ शकतात. यामध्ये लठ्ठपणा, विविध हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, चयापचय रोगांचा धोका वाढणे आणि अगदी कर्करोगाचा धोकादेखील समाविष्ट आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, भविष्यातील हवामान बदलामुळे साखरेच्या सेवनाशी संबंधित आरोग्याचे धोके वाढतील असे अनुमान आहे. विशेषतः ज्यांचे सरासरी दैनिक सेवन २०१५-२०२० च्या अमेरिकन आहार मार्गदर्शक तत्त्वांच्या शिफारसींपैकी १० टक्के आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शिफारसींपैकी जवळजवळ २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित लोकसंख्येत याचे प्रमाण जास्त असू शकेल.