अमरावती : मेळघाटातील खडीमल या गावातील काही मजूर हे धाराशीव जिल्ह्यात ऊस तोडणीच्या कामासाठी गेले आहेत. होळीचा सण तोंडावर आल्याने मजुरीचे पैसे मिळावेत आणि सण साजरा करण्यासाठी गावी परतता यावे, यासाठी मजुरांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना मुकदमाकडून मजुरीचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आणि त्यांची अडवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट मुकादम व मालकाशी बोलून या मजुरांना परत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
बच्चू कडू यांनी मुकादमाशी मोबाईलवरून संवाद साधला. मजुरीचे पैसे का मिळाले नाहीत, अशी विचारणा केली. त्यावर मुकादम समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी थेट मालकाशी चर्चा केली. खडीमल येथील मजूर होळी सणासाठी परत आपल्या गावी येण्यासाठी इच्छूक आहेत आणि त्यांना मजुरीचे पैसे अद्याप का देण्यात आले नाहीत, अशी विचारणा बच्चू कडू यांनी केली. त्यावर गायकवाड नावाच्या व्यक्तीने मजुरांना अग्रीम रक्कम दिली. नंतर पूर्ण रक्कमही दिली, असा दावा केला. पण, मजुरांना परत का येऊ दिले जात नाही, अशी विचारणा करत याबाबत तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, असा दम बच्चू कडू यांनी दिला. बच्चू कडू यांनी थेट धाराशीव जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला.

















