नवी दिल्ली : उच्चांकी स्तरावर वाढलेल्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याज दर ०.७५ टक्के वाढविण्याची घोषणा केली. अमेरिकेने गेल्या तीन दशकांत केलेली ही सर्वात मोठी व्याज दरवाढ आहे. आता अमेरिकेतील व्याजदर वाढून १.५०-१.७५ टक्के झाला आहे. गेल्या ४० वर्षातील हा सर्वाधिक दर आहे.
अमेरिकेने व्याजदर वाढविल्याचा परिणाम भारतासह जवळपास सर्व जगातील अर्थव्यवस्थांवर दिसून येतो. अमेरिकेत आता किरकोळ महागाईचा दर ८.६ टक्के आहे. हा गेल्या चार दशकांतील सर्वाधिक दर आहे. फेड़रल रिझर्व्हने हा व्याजदर २ टक्क्यांनी घटविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे फेडरल रिझर्व्हने आक्रमकपणे व्याज दरवाढीची भूमिका घेतली आहे. यातील अर्थव्यवस्थेतील तरतला कमी होऊन मागणी वाढण्यावर नियंत्रण येईल. मात्र यासोबतच व्याजदर गतीने वाढल्याने अर्थव्यवस्थेवरील मंदीचा धोकाही अधिक गंभीर होताना दिसून येऊ शकतो. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविल्यानंतर त्याचा दबाव भारतीय रिझर्व्ह बँकेवर (आरबीआय) निर्माण होतो.
आरबीआयने एप्रिल महिन्यातील एमपीसीच्या बैठकीत महागाईला खास महत्त्व दिले नव्हते. मात्र जेव्हा फेड़रल रिझर्व्हने आक्रमक भूमिका घेतली, तेव्हा मे महिन्यात आरबीआयने तातडीने व्याज दर वाढीस सुरुवात केली. जून महिन्य़ातील दुसऱ्या बैठकीतही आरबीआयने दरवाढ केली आहे. भाकतात आता किरकोळ महागाईचा दर ७.०४ टक्के आहे. आरबीआयने हा दर ६ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आरबीआयने रेपो रेट ०.९० टक्के वाढवून ४.९० टक्के केला आहे.












