कोल्हापूर : सध्या भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित केले जात आहे. इथेनॉल निर्मितीमुळे देशातील शेतकऱ्यांना याचा थेट लाभ झाला असून, ऊस, मका व भात उत्पादक शेतकऱ्याच्या मध्ये सर्वाधिक ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यात येऊ नये तसेच इथेनॉलशिवाय पर्यायी इंधन वापरण्याची मुभा द्यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल आव्हान याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे देशातील पाच कोटी ऊसउत्पादकांना दिलासा मिळाला आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
काही व्यापारी, काही कंपन्याच्या वतीने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यात येऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई व न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन या खंडपीठाने फेटाळली. याबाबत शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात धान्य व उसापासून जवळपास १६८५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. देशातील मूठभर कुड ऑईलचे व्यापारी व काही वाहन कंपन्यांनी हेतुपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी इथेनॉलबाबत गैरसमज पसरवित आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल धोरणास चालना दिल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलनाची १ लाख ४४ हजार कोटींची बचत झाली आहे. इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योग स्थिरावल्यामुळे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. दरवर्षी ४० हजार कोटी थेट ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मिळू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.