छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा विभागातील उसाचे क्षेत्र यंदा कमी होण्याची शक्यता राज्याच्या कृषी विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने ३१ जुलैपर्यंतच्या पावसाच्या आधारे कृषी विभागाच्या अहवालातून ऊस लागवडीची आकडेवारी संकलित केली आहे. त्यानुसार, यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी, तरीही उसाची लागवड कमी झाल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पावसाच्या आधारे गोळा केलेली आकडेवारी ही सद्यस्थिती दर्शवत आहे.उसाचे उत्पादन घटल्यास त्याचा फटका आगामी गाळप हंगामात साखर कारखान्यांना बसू शकतो.
छत्रपती संभाजीनगर विभागात सुमारे २ लाख हेक्टरमध्ये उसाची लागवड केली जाते. परंतु, सध्या ऊस लागवडीसाठी वापरता येणारे क्षेत्र सुमारे १.४२ लाख हेक्टर आहे. नांदेड विभागात सुमारे १.४१ लाख हेक्टर ऊस लागवडीखालील क्षेत्र आहे, मात्र यंदा ते १.२५ लाख हेक्टरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, असे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. पावसाच्या आधारे ऊस लागवडीतील वाढ किंवा घटीचा अंदाज बांधता येतो. गेल्या वर्षी महाराष्ट्रात १४.०२ लाख हेक्टर ऊस लागवडीचे क्षेत्र होते, मात्र आता ते ११.६७ लाख हेक्टरवर आले आहे. आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या आयुक्त कार्यालयांतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या दोन विभागांमध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र कमी होऊ शकते.


















