श्रीरामपूर : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) अशोक कारखान्याला ९० कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी प्रती टन ३०० रुपये आणि कामगारांचे पाच महिन्यांचे थकीत वेतन अदा करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी केली आहे. अशोक कारखाना साखर उत्पादनाव्यतिरिक्त वीजनिर्मिती, अल्कोहोल व इथेनॉल अशा उप पदार्थांची निर्मिती करतो. या उपपदार्थांचा नफा कोठे जातो? असा सवाल शेडगे यांनी यावेळी केला. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत कामगारांच्या वेतनातून २५ टक्के कपात का करण्यात आली अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेडगे म्हणाले की, चेअरमन साखरेला भाव नसल्याची तक्रार करतात. त्यामुळे आर्थिक अडचणी असल्याचे सांगतात. पण ही अडचण जिल्ह्यातील इतर कारखान्यांना का नाही?
कारखान्यात सध्या अनागोंदी कारभार सुरु आहे. भंगाराचा आणि साखर घोटाळाही होत असल्याची चर्चा आहे. संचालक मंडळाने सभासदांचा विश्वास गमावला आहे. कारखान्याची कशी करून श्रीरामपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी शेडगे यांनी केली. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा सुनिता वानखेडे, शितल पोकळे, कोमल वानखेडे, आशा महांकाळे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ दिघे, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, मधू काकड, शांताराम महांकाळे, रवी वानखेडे, युवराज देवकर, बाळासाहेब घोगरे, मयुर भनगडे, नामदेव घोगरे, पोपटभाई शेख, बब्बू पठाण आदी उपस्थित होते.