नवी दिल्ली : आसाममधील पुराने हाहाकार माजवला आहे. राज्यातील जवळपास २७ जिल्ह्यांतील ६ लाखांहून अधिक लोकांना मोठा फटका बसला आहे. ४८ हजार लोकांना २४८ निवासी शिबिरांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. होजाई आणि काचर या दोन जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मदत अभियानांतर्गत होजाई जिल्ह्यातील २ हजारांहून अधिक लोकांची लष्कराने सुटका केली. आसाम सरकारने भूस्खलन आणि पुरामुळे बराक घाटीचा राज्याच्या इतर भागाशी संपर्क तुटल्यानंतर अडकलेल्या यात्रेकरुंची सुटका करण्यासाठी विभागीय फ्लायबिग एअरलाइन्ससोबत करार केला आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, सरमा यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, सिलचर आणि गुवाहटी यांदरम्यान ३००० रुपये प्रती तिकीट या दराने प्रवासासाठी विमान कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. आगामी दहा दिवसांसाठी ही सुविधा असेल. दररोज ७० ते १०० यात्रेकरु याचा लाभ घेतली. विमान कंपनीला उर्वरीत रक्कम सरकार अनुदान स्वरुपात देणार आहे. आसाममध्ये पूरग्रस्त भागात अडकलेल्या गुवाहाटी एक्स्प्रेस आणि गुवाहाटी सिलचर एक्स्प्रेस रेल्वेमधील प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा मिळाल्यानंतर मदत देण्यात आली आहे. रेल्वेची अनेक ठिकाणची सेवा विस्कळीत झाली आहे. एनआफआरच्या अंतर्गत हा पूरग्रस्त भाग येतो. या भागातील प्रवाशांचा संपर्क सुरळीत राहावा यासाठी कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येत आहे. खराब हवामानामुळे लामडिंग, बदरपूर पर्वतांमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. पाणी साठण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रेल्वे ट्रॅक, पूल, रस्ते, टेलिफोन नेटवर्कचे मोठे नुकसान झाले आहे.















