कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बुधवारी घोषणा केली की, १६ वर्षांखालील मुलांसाठी ऑस्ट्रेलियाने नवीन सोशल मीडिया बंदी अधिकृतपणे लागू केली आहे, ज्यामुळे १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया जगातील पहिला देश बनला आहे. अल्बानीज म्हणाले की, हे असे पाऊल आहे जे कुटुंबांना अधिक मानसिक शांती देईल आणि तरुणांना अधिक पारंपारिक बालपण अनुभवता देईल.
अल्बानीज यांनी एका संदेशात म्हटले आहे कि, ऑस्ट्रेलियामध्ये १६ वर्षांखालील मुले त्यांचा दिवस थोडा वेगळ्या पद्धतीने सुरू करत आहेत, ते ही सोशल मीडियाशिवाय. हा एक मोठा बदल आहे आणि आम्ही जगातील पहिला देश आहोत.त्यांनी अल्गोरिदम, अंतहीन स्क्रोलिंग आणि डिजिटल प्रभावांमुळे निर्माण होणाऱ्या दबावांवर भर दिला ज्याचा सामना कोणत्याही मागील पिढीला करावा लागला नाही. नवीन नियमांमुळे पालकांपेक्षा सोशल मीडिया कंपन्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.
“आजचा बदल म्हणजे तुमच्या मुलांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देणे. जबाबदारी जिथे आहे तिथेच टाकणे – पालकांवर नाही तर सोशल मीडियाच्या दिग्गजांवर,असेही त्यांनी सांगितले. “१६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालून, आपण मुलांना बालपण आणि पालकांना अधिक मनःशांती देत आहोत,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या मते, १० डिसेंबरपासून देशातील १६ वर्षाखालील कोणीही टिकटॉक, इंस्टाग्राम, यूट्यूब, स्नॅपचॅट, एक्स (पूर्वी ट्विटर), फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मवर अकाउंट ठेवू शकणार नाही किंवा तयार करू शकणार नाही. सोशल मीडिया कंपन्यांना अल्पवयीन वापरकर्त्यांना ब्लॉक करावे लागेल किंवा त्यांना अंदाजे ५० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सपर्यंतचा मोठा दंड भरावा लागेल.
गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सुरक्षा सुधारणा (सोशल मीडिया किमान वय) विधेयक २०२४ मंजूर झाल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. काही प्लॅटफॉर्मवरील खात्यांसाठी कायद्यानुसार किमान वय १६ वर्षे अनिवार्य आहे आणि पालक संमती देऊन हे बंधन रद्द करू शकत नाहीत.


















