नवी दिल्ली : केंद्र सरकार सार्वजनिक वाहतूक १०० टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांवर स्थलांतरीत करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, लवकरच भारतात बहुसंख्य वाहने १०० टक्के इथेनॉलवर धावतील. शनिवारी त्यांनी सांगितले की, ऑटोमोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढील सहा महिन्यात फ्लेक्स – फ्यूएल व्हेरियंटच्या वाहनांची निर्मिती सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.
इटी ग्लोबल बिझनेस समीटमध्ये बोलताना मंत्री म्हणाले की, सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहने १०० टक्के स्वच्छ ऊर्जा स्त्रोतावर चालविण्याच्या योजनेवर काम करीत आहे. सद्यस्थितीत तांदूळ, मक्का, ऊसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन केले जात आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोल अधिक स्वच्छ असते. तसेच पेट्रोल अथवा डिझेलच्या तुलनेत हरित व स्वच्छ इंधन पर्यावरणामध्ये कमी प्रदूषण करते. भारताने वाहनांपासून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी पुढील काही वर्षांमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पुढे केले आहे. सध्या ब्राझील आणि अमेरिकेत इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मंत्री गडकरी म्हणाले, भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी रणनीतीनुसार या सेगमेंटमध्ये मोठी झेप घेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये भारत सरकारने वाहन निर्मात्यांना फ्लेक्स इंधनाचे इंजिन तयार करण्याचा सल्ला दिला होता. इथेनॉलशिवाय भारत सरकार हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनाचा वापर करण्यावरही लक्ष देत आहे. इथेनॉल उत्पादन वाढ आणि पेट्रोलमधील मिश्रणामुळे भारताला इंधन आयातीचा खर्च कमी करता येईल असे गडकरी यांनी सांगितले.












