पुणे : बारामती तालुक्यातील ५९,३९२ हेक्टर बागायती क्षेत्र असून, यापैकी २४,०७०.५० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड आहे. पिकांचा समावेश आहे. मात्र, वर्षानुवर्षे सतत ऊस लागवडीमुळे जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. पाण्याचा अतिवापर आणि खतांचा अमर्यादित वापर यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे, तसेच उसाची सरासरी उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे कृषी विभाग-आत्मा अंतर्गत बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस पिकाला पर्याय म्हणून केळी लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी विशेष समूह विकास कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत हेक्टरी २,८९,००० रुपये अनुदान देण्याची तरतूद केली आहे.
कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केळी लागवड हा ऊस पिकाला पर्याय ठरू शकतो. केळी पिकाला कमी पाणी लागते. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पाणी, खतांचा नियंत्रित वापर शक्य होतो. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि क्षारपड जमिनीचे व्यवस्थापन होण्यास मदत होते. केळी पिकाची १२ ते १५ महिन्यांत दोनदा तोडणी होते. प्रती एकर ३० ते ५० टन उत्पादन मिळते. निर्यातक्षम केळीस सरासरी १०,००० रुपये टन दर मिळतो. यातून कमी कालावधीत अधिक नफा मिळतो. याबाबत आत्मा योजनेचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव म्हणाले की, आत्माच्या माध्यमातून केळी पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती मिळणे करिता प्रशिक्षणाची देखील नियोजन करण्यात आले आहे. तर तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी सांगितले की, केळी लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होईलच, शिवाय जमिनीची सुपीकता वाढून पुढील पिकाच्या उत्पादनातही वाढ होईल.