बीड : राज्यात सर्वाधिक ऊसतोड मजूर पुरविणारा जिल्हा अशी बीडची ओळख आहे. अंबाजोगाई, परळी, धारूर, केज, वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी या सर्वच तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यात देखील ऊस तोड मजुरांचे स्थलांतर होते. मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना असल्या, तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता आहे. मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. या समस्येवर मार्ग शोधण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केला आहे. यासाठी ‘आरोग्य साथी’ ही संकल्पना आणली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दि. ७ ऑगस्ट रोजी या योजनेला प्रारंभ होणार आहे.
या योजनेंतर्गत गावांत मजुरांपैकीच एका सातवी पास महिलेची आरोग्य साथी म्हणून निवड करून त्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना प्रथमोपचाराचे साहित्य सोबत दिले जाईल. त्यामुळे कारखान्यांवरदेखील किरकोळ आजार आणि जखम झाल्यानंतर मजुरांना उपचार मिळू शकणार आहेत. मजूर कारखान्यांवर स्थलांतरित झाल्यानंतर त्यांना राहत असलेल्या ठिकाणी काही किरकोळ आजार किंवा ऊसतोडणीच्या फडात जखम झाल्यानंतर त्वरीत उपचार मिळतील अशी सोय केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी जितीन रहमान म्हणाले की, ऊसतोड कामगार व विशेषतः महिला मजुरांची कारखान्यांवर उपचारासाठी परवड होते. त्यामुळे आरोग्य साथींच्या माध्यमातून त्यांना कारखान्यांवरही प्रथमोपचार मिळतील. साधना तज्ज्ञांकडून किरकोळ आजारांवरील गोळ्या-औषधी व जखमेवर मलमपट्टी करण्याचे प्रशिक्षण आणि सोबत प्रथमपोचार साहित्य दिले जाईल. २० ते ३० मजुरांमागे एक अशी एक आरोग्य साथी असेल. साधारण १४०० आरोग्य साथींची निवड केली जाईल.











