बीड : धारूर तालुक्यात डांबून ठेवलेल्या उत्तर प्रदेशातील १५ ऊसतोड मजुरांची सुटका

बीड: धारूर तालुक्यातील आमला-हिंगणी (बु.) येथील ओम चंद्रकांत सोळंके याने एका व्यक्तीच्या मदतीने उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील काही मजुरांना नोव्हेंबरमध्ये ऊसतोडीसाठी आणले होते. मात्र, काम करून घेत असताना त्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही. मजुरीची मागणी केल्यास त्यांना मारहाण केली जात होती तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या मजुरांना विना मोबदला काम करून घेत, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या देत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले व धारूरचे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी बुधवारी सायंकाळी तातडीची कारवाई करून सर्व मजुरांची सुटका केली. याप्रकरणी संशयित ओम चंद्रकांत सोळंके याच्याविरुद्ध दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी पत्र व दूरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली. पथकात नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, मंडळ अधिकारी लहु केदार, सोपान वाघमारे, संबंधित तलाठी यांसह दिंद्रुड पोलिसांचा समावेश होता. पथकाने तात्काळ छापेमारी करत सर्व १५ मजुरांची मुक्तता केली. मजुरांना माजलगाव तहसील कार्यालयात आणून त्यांच्या जेवण व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. विशेष वाहनाद्वारे त्यांना त्यांच्या मूळ गावी, उत्तर प्रदेशात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. पोलिस जमादार सिद्धेश्वर डोईफोडे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here