बीड : केज, अंबाजोगाई तालुक्यातील कारखान्यांकडून २,८०० रुपये उचल देण्याची घोषणा, आंदोलन स्थगीत

बीड : केज व अंबाजोगाई तालुक्यांतील अंबा सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट आनंदगाव (सा.) गंगा माउली शुगर उमरी, केज या साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल २८०० रुपये देण्याची घोषणा केली. त्यानंतर शेतकरी संघर्ष समितीने चक्काजाम आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी ही माहिती दिली. याबाबत झालेल्या बैठकीला तहसीलदार राकेश गिड्डे, केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, गंगा माउली शुगरचे शेतकी अधिकारी अदनाक, अंबा साखर शेतकी अधिकारी शिंदे, येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्टचे पाटील, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमिटीचे सदस्य भाई मोहन गुंड व आंदोलक शेतकरी उपस्थिती होते.

दोन्ही तालुक्यांतील कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी विनाकपात ३००० रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने बुधवारपासून (ता. ३) केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारले होते. त्यामुळे आंदोलनापूर्वीच पोलिस प्रशासन व तहसीलदारांच्या मध्यस्थीने कारखानदारांचे शेतकरी प्रतिनिधी व आंदोलक शेतकरी नेते, पदाधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी ऊस दरासंदर्भात चर्चा झाली. अखेर कारखान्यांनी यावर्षी पहिली उचल विनाकपात २८०० रुपये देण्याचे मान्य करत चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. यावर एकमत होऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here