बीड : जिल्ह्यातील साधारण 350 पेक्षा जास्त गावातून ऊसतोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर होते. या ऊसतोड मजुरांच्या अनेक प्रश्नांपैकी त्यांच्या उपचाराचा प्रश्न अधिक गंभीर आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने ‘आरोग्य साथी’ हा प्रकल्प सुरू केला आहे. किमान सातवी शिक्षण झालेल्या महिलेची आरोग्य साथी म्हणून निवड केली जात आहे. ऊस तोड कामगार व विशेषतः महिला मजुरांची कारखान्यांवर उपचारासाठी परवड होते. तसे होऊ नये यासाठी २० ते ३० मजुरांमागे एक आरोग्य साथी असेल. अशा १४०० आरोग्य साथींची निवड केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात या साथीला तज्ज्ञांकडून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ऊसतोड मजुरांच्या गावातील एका महिलेची आरोग्य साथी म्हणून निवड केली जात आहे. यामुळे कारखान्यांवर मुजरांना वेळीच उपचार मिळू शकणार आहेत. राज्यात सर्वाधिक ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा अशी बीडची ओळख आहे. अंबाजोगाई, परळी, धारूर, केज, वडवणी, माजलगाव, गेवराई, बीड, शिरूर कासार, पाटोदा, आष्टी अशा सर्वच तालुक्यांतून ऊस तोडणीसाठी पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतदेखील मजुरांचे स्थलांतर होते. त्यांच्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यरत आहे. मात्र या मजुरांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी ‘आरोग्य साथी’ ही संकल्पना राबवली आहे. आरोग्य साथींना किरकोळ मलमपट्टी करण्याचे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिले जाईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले.