बीड : मागील काही दिवसांपासून मोठ्या भांडवलदारांनी खाजगी साखर कारखानदारी सुरू केल्याने सहकारी क्षेत्रातील कारखानदारीला या खासगी कारखानदारीशी स्पर्धा करत वाटचाल करावी लागत आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत येत असल्याचे साखर संघाचे उपाध्यक्ष तथा कारखान्याचे मार्गदर्शक, आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा ३४ वा उस गळीत हंगाम शुभारंभ सोहळा नारायणगड संस्थानचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते व आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत गव्हाण पूजन करून आणि गव्हाणीत उसाची मोळी टाकून पार पडला. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक धैर्यशील सोळंके, कारखाना अध्यक्ष विरेंद्र सोळंके, उपाध्यक्ष जयसिंह सोळंके यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
आमदार सोळंके म्हणाले, खासगी साखर कारखानदारीत मोठ्या भांडवलदारांनी सहभाग घेत साखर उद्योग सुरू केल्याने सहकारी साखर उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सहकार उद्योगाची दमछाक होत आहे. या हंगामात १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट पार करण्यासाठी कारखान्याचे उसतोड मजूर, कर्मचारी आणि कामगारांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कारखाना कर्मचाऱ्यांना पगारवाढ
राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर विचार व चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समिती व साखर कारखाना प्रतिनिधी यांच्यात झालेल्या यशस्वी चर्चेनंतर त्रिस्तरीय करार करण्यात आला. या त्रिस्तरीय करारात साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या पगारात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा आमदार सोळंके यांनी केली. लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ही नवीन पगारवाढ १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.


