बीड : जिल्हा परिषदेच्या शाळेत सुविधांचा बोजवारा, ऊसतोडणी मजुराच्या मुलीने लिहिले उपमुख्यमंत्र्यांना पत्र

बीड : शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे, वर्गखोल्यांमध्ये साधे बाक नाहीत आणि खेळाचे साहित्यही नाही. शिक्षकांविषयी आम्हाला आदर आहे, पण सुविधांअभावी आमचे नुकसान होत आहे, असे पत्र परभणी केसापुरी (ता. बीड) येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने लिहिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या या पत्रातून प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. आम्हालाही स्वप्न पाहायचं आहे. डॉक्टर-कलेक्टर व्हायचं आहे; पण शाळेत सुविधा नाहीत. मग शिकायचं कसं? आम्ही आयुष्यभर ऊसतोड मजूरच राहायचं का? अशी विचारणा या विद्यार्थिनीने केली.

उपमुख्यमंत्री पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना हे पत्र विद्यार्थिनीने लिहिले आहे. या विद्यार्थिनीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शाळेत वॉटर फिल्टर, खेळाचे साहित्य, डिजिटल शिक्षण आणि प्रोजेक्टरसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचे सरकारी कागदपत्रांवर दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात शाळेत यापैकी काहीच उपलब्ध नाही. आमच्याकडे काहीच नाही, सगळं फक्त कागदावरच आहे. जर जिल्ह्यात कोळवाडीसारख्या आदर्श शाळा उभ्या राहू शकतात, तर आमच्या शाळेवरच अन्याय का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे. अंकिताने आपल्या पत्रातून शाळेची दयनीय अवस्था मांडली आहे. अंकिताच्या पत्राची दखल सरकार घेणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here