बीड : ऊस दर प्रश्नी माजलगावात शेतकऱ्यांचा रास्ता रोको, आज बैठक

बीड : बीड जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी प्रचलित कायद्याप्रमाणे ९.५ च्या उताऱ्यावर उसाला २,४४३ रुपये प्रति टन ऊस दर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. उत्पादन खर्च पाहता हा दर न्याय देणारा नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ऊस दरप्रश्नी शेतकरी व विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी माजलगावातील वसंतराव नाईक चौकात तब्बल साडेपाच तास महामार्ग रोखून धरत आक्रमक आंदोलन केले. त्यामुळे परभणी, तेलगाव, खामगाव पंढरपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, मंगळवारी (ता. २५) जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारखाना प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधींची ऊस दराविषयी बैठक होणार आहे.

शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी संघटना, शेकाप, युवा शेतकरी संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले. उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती शेतकऱ्यांना केली. मात्र सकारात्मक निर्णय नाही तोवर माघार नाही, अशी भूमिका ॲड. अजय बुरांडे यांनी घेतली. आंदोलनात किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, कालिदास आपेट, अजय राऊत, तुकाराम नावडकर, भाई नारायण गोले, मोहन जाधव, दिनकर चाळक, नामदेव सोजे, ॲड. अजय बुरांडे, जगदीश फरताळे, दीपक लिपने, विजय दराडे, कॉ. कृष्णा सोळंके, गंगाभीषण थावरे सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here