बीड : माजलगाव येथील बाजार समितीत जिल्हाभरातील सर्व शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी आंदोलनातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला. ऊस दरप्रश्नी सोमवारी दि. २४ रोजी माजलगाव येथे होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संघटनांद्वारे करण्यात आले आहे. किमान एफआरपीप्रमाणे एकरकमी उचल मिळायला हवी, अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, साखर उतारा हाच अंतिम ऊसदराचा निकष न राहाता रेव्हन्यू शेअरिंग फॉर्मुल्यानुसार साखर उताऱ्यासाठी ७०:३० व इतर उपपदार्थावर ७५:२५ हा शेतकरी व कारखानदारांचा वाटा लक्षात घेऊन उसाला किमान चार हजार रुपये अंतिम ऊस दर मिळालाच हवा. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, ॲड. अजय बुरांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड. ढगे, युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजय राऊत, जगदीश फडताळे उतरणार आहेत.


















