बीड : लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 2) दुपारी घडली. कारखाना आणि धारूर, वडवणी, माजलगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस कनव्हेअरला शुक्रवारी दुपारी आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे कारखान्याचे साहित्य आगीत खाक झाले.
आग लागल्याचे दिसताच तेथील कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनाला कळविले. तातडीने तेथील अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येत नव्हती. यामुळे वडवणी, धारूर, माजलगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग आटोक्यात आली. तोपर्यंत १०० मे.ट. बगॅस, रबर बेल्ट सीसी ४, बीसी ३, बीसी-८ व ट्रॅश कटर, इलेक्ट्रिक मोटार, केबल, ॲडलर, ड्रम आदी साहित्य या आगीत जळाल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.